दि. १५ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय 'हात धुवा दिवसा' चे औचित्य साधून राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत व्यापक स्वरूपात 'हात धुवा दिवस' साजरा करण्यात आला. हात धुवा मोहिमेच्या निमित्ताने गावागावात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला.
यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात स्वच्छता व आरोग्याविषयीची जागृती करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संवाद व क्षमता विकास कक्षातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमांतर्गत शाळांमध्ये दुपारी जेवणाच्या सुटीत जेवणापूर्वी साबणाने हात धुणे, स्वच्छता राखण्याबाबत प्रतिज्ञा घेणे, शाळेत चिल्ड्रन कॉबिनेटची स्थापना, प्रभात फेरी, ग्रामसभेत प्रबोधन, परिसर स्वच्छता, आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयानी देखील विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले. प्रत्येक विद्यार्थ्याने दहा लोकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविला. राज्यभर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता मोहिमेअंतर्गत देखील हात धुवा दिवस साजरा करण्यात आला. राज्यात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने देखिल वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. विकसनशील देशात साबणाने किंवा राखेने हात धुण्याची संख्या केवळ ३० ते ३५ टक्के आहे. त्यामुळे फैलणार्या रोगांचे प्रमाण पाहता याबाबत जनजागृती करण्याची अधिक आवश्यकता आहे.
सांगली जिल्ह्यात ६५ हजार स्वच्छतादूतांनी केलेल्या जनजागृतीमुळे हात धुण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानाअंतर्गत प्रत्येक स्वच्छता दूतास या मोहिमेचा प्रसार करण्यासाठी पाच कुटुंबे दत्तक देण्यात येतात. शौचाहून आल्यावर साबणाने हात धुणे, जेवणापूर्वी साबणाने हात धुणे, शौचालयाचा वापर करणे, नखे काढणे आदी संदेश घराघरात पोचविले जात आहेत.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने मुलांना हा दिवस साजरा करीत स्वच्छ हाताची जादू पसरविण्याचा दिलेला संदेशही मोहिमेसाठी उपयुक्त ठरला आहे. या मोहिमेत सहभागी होत हात स्वच्छ ठेवणे, हा आपल्या दैनंदिन सवयीचा भाग करणे हेच व्यक्तिच्या आणि समाजाच्या हिताचे आहे. त्यादृष्टीने आज विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आलेला 'हात धुवा दिवस' उपयुक्त ठरला आहे.
लोड होत आहे...
प्रतिसाद