दिवाळी म्हटली की, सुवासिक उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, नवीन कपडे, दागिने आणि गोडधोड पदार्थ आलेच. यात फार फरक पडला नसला तरी सुवासिक उटणे लावून आंघोळ करण्यावर तरुणाईने जणू बहिष्कार टाकल्याचे दिसत आहे. उटण्यांची जागा आता ब्युटीपार्लरमधील स्क्रबने घेतली आहे.
प्राचीन काळापासून सुवासिक उटणे लावून स्नान करण्याची पद्धत प्रचलित आहे. मकरसंक्रांतीला पाण्यात तीळ घालून स्नान केले जाते, तर दिवाळीला आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या वनस्पतींना कुटून अंगावर चोळण्याची पद्धत आहे. नागकेशर, नागरमोथा, चंदन, वेखंड, ज्येष्ठमध, गहुला, गुलाब आदींची भुकटी अंगाला घुसळायची आणि मग आंघोळ करून बाहेर पडले की दिवसभर फ्रेश! अशाप्रकारच्या उटण्याने मृत त्वचा नष्ट होऊन त्वचेची रंध्रे मोकळी होतात आणि दिवसभर उत्साह वाटतो. शरीरशुद्धी, चैतन्य टिकवून ठेवणे व त्यानंतर शुद्ध अंतःकरणाने पूजा करणे, हा त्यामागील हेतू होता. पाषाणयुगापूर्वीही लोक हेच वापरत. हळद आणि बेसन यांचा वापरही नेहमीच व्हायचा. मात्र, आता त्याची जागा साबण, शाम्पू व डिओडरंटने घेतली. महिला आणि पुरुषही (विशेषत: तरुण आणि तरुणी) ब्युटीपार्लरमध्ये जाताना दिसतात. उटण्याचे पदार्थ गोळा करून त्याचे चूर्ण बनविण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ही तरुणाई स्क्रब लावण्याकडे वळत आहे. १९८० ते २००० या काळात साबणाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. आताही होत आहे. पण, २००१ नंतरचा काळ आयुर्वेदाच्या उत्थानाचा काळ समजला जातो. लोकांना रासायनिक पदार्थांपासून बनविलेले साबण व अन्य सौंदर्यप्रसाधनांच्या दुष्परिणामांची जाणीव होऊ लागल्याने त्यांचा वापर कमी होऊ लागला. तरीही तरुणाई सुवासिक उटण्याकडे वळली नाही. त्यापेक्षा आयुर्वेदाने "हर्बल' असे भुरळ पाडणारे नाव देऊन तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. साबण आणि सौंदर्यप्रसाधने सहज उपलब्ध होत असल्याने व उटण्यांचा प्रचार होत नसल्याने आम्ही ते वापरतो, असे मत प्रियंका मेश्राम, श्वेता राऊत, मीनाक्षी कुनघाडकर या महाविद्यालयीन तरुणींनी व्यक्त केले.
सुगंधा कावळे ही वृद्ध महिला म्हणाली की, आमच्या काळात साबणाचा पत्ता नव्हता. पण, आताच्या तरुण पोरी अंगाला नको ते लावून अंग खराब करतात.
""रेडिमेड हर्बल प्रॉडक्टची गुणवत्ता तपासण्याची कोणाला गरज वाटत नाही. अनेकदा हर्बलच्या नावाखाली फसवणूक होते. त्यापेक्षा औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींपासून तयार केलेले शुद्ध सुवासिक उटणे वापरणे केव्हाही चांगले.''
लोड होत आहे...
प्रतिसाद